काळा घोडा आर्ट कार्ट (KGAK) १० डिसेंबर २०२१ ते ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत
कोरोना काळात काम बंद असल्याने कारागिरांवर आर्थिक संकट आले होते. त्यांचे हे संकट दूर व्हावे म्हणून काळा घोडा आर्ट कार्टने कारागिरांना आता वर्षभरासाठी जागतिक व्यासपीठ देण्याचे ठरवले आहे
काळा घोडा आर्ट्स फेस्टिव्हल (KGAF) फेब्रुवारीमध्ये पुन्हा सुरु होत आहें. यंदाची थीम ब्लॅक हॉर्स उडान अशी आहे. याचाच अर्थ कलाकार, कारागिरांना एका उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी काळा घोडा आर्ट फेस्टिव्हल सज्ज झाला आहे. या उत्सवात कलाप्रेमींना जेवढा कलेचा उत्कृष्ट अनुभव घेता येतो तितकाच तो कलाकार, कारागिरांचा संरक्षक म्हणूनही ओळखला जातो. कोरोनामुळे यंदा स्थानिक कारागीर प्रचंड प्रभावित झाले. त्यांच्या आर्थिक पुनर्प्राप्तीला चालना देण्यासाठी, काळा घोडा आर्ट फेस्टिव्हल टीमने एक अनोखी योजना आखली आहे. यंदा १० डिसेंबरपासून काळा घोडा आर्ट कार्ट (KGAK) आयोजित करण्यात आला असून तो जवळ-जवळ एक वर्ष म्हणजे ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत सुरु राहाणार आहे.काळा घोडा असोसिएशनने खास क्युरेट केलेल्या ऑनलाइन मार्केटप्लेसचा उद्देश भारतभर पसरलेल्या अस्सल कला निर्माण करणारे समुदाय आणि लहान-लहान कारागीर यांच्यातील दरी भरून काढणे हा आहे. “आर्ट कार्टच्या माध्यमातून आमचा प्रयत्न, शिल्पकारांच्या अनोख्या कथा आणि निर्मिती समोर आणण्याचा आहे. काळा घोडा आर्ट कार्ट फेब्रुवारीच्या नऊ दिवसांपुरता मर्यादित राहणार नाही तर वर्षभर चालेल. त्यामुळे काळा घोडा परिसर कलाकारांचे आश्रयस्थान म्हणून समोर येईल.” असे काळा घोडा असोसिएशनच्या अध्यक्षा ब्रिंदा मिलर यांनी सांगितले.
काळा घोडा आर्ट कार्टमध्ये भारतातील कुशल कारागिरांनी बनवलेल्या कापडी दागिन्यांपासून ते स्कार्फ, शर्ट्स आणि घरासाठींच्या शोभेच्या वस्तूंपर्यंत सर्व प्रकारचे स्टॉल्स असतील. या आर्ट कार्टसाठी देशभरातून एकूण ५०० पेक्षा जास्त कारागिर, संस्थांनी रुचि दर्शवली होती. त्यापैकी सर्वोत्कृष्ट अशा ५० पेक्षा जास्त कलाकार आणि कारागिरांना काळा घोडा आर्ट कार्टमध्ये संधी देण्यात येणार आहे. “काळा घोडा आर्ट कार्टमधील अनेक स्टॉल भारतातील विविध राज्यांतील आहेत. आम्ही किरकोळ विक्रेत्यांच्या तुलनेत कारागिरी आणि डिझाइन्सकडे जास्त लक्ष देतो. पारंपारिक भारतीय कला शैलींवर लक्ष केंद्रित करून कलेक्शनमध्ये पर्यावरणपूरक आणि समकालीन उपयुक्तता मूल्य शोधतो,” अशी माहिती काळा घोडा आर्ट कार्टचे क्यूरेटर मयंक वल्लेशा यांनी दिली.
आर्ट मार्टमध्ये येणाऱ्या रसिकांना हरियाणातील हिस्सार येथील हाताने नक्षीकाम केलेली सुंदर पादत्राणे, कोरड्या पानांपासून बनवलेल्या प्रिंटच्या साड्या, अहमदाबादमधील प्लास्टिकच्या कचऱ्यापासून बनवलेल्या पिशव्या आणि छत्तीसगढच्या बस्तर जिल्ह्यातील सुक्या दूधीपासून आणि कागदापासून बनवलेले विंड चाइम आणि दिवे येथे पाहायला आणि विकत घ्यायला मिळतील.
देशात अजूनही अशा काही व्यक्ती आणि गट आहेत ज्यांनी अजूनही पारंपरिक विणकाम टिकवून ठेवले आहे. अशा व्यक्ती आणि संस्था जागतिक व्यासपीठावरही पाहायला मिळतात. या संस्था व्यक्ती पारंपरिक अभिव्यक्ती, योजना आणि कलाकृतींचा वापर सध्याच्या महानगरीय जीवनासाठी उपयुक्त ठरतील अशा प्रकारे तयार करतात.
“हरित आणि हवामान/प्राण्यांसाठी काम करणाऱ्या संघटनांना देखील आम्ही या कार्टमध्ये स्टॉल्स लावण्यासाठी आग्रह केला आहे. जगामध्ये चांगले काम करून जीवनमान सुधारण्यास मदद करण्यास तयार असलेल्या व्यक्ती आणि संस्थांना KGAK मदत करण्यास सतत सक्षम आहोत.” असेही ब्रिंदा मिलर यांनी यावेळी सांगितले.
Comments
Post a Comment